Wednesday, November 5, 2008

जगत आलो मी असा...

जगत आलो मी असा...
जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही।

एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही...

जन्मभर अश्रुंनी माझ्या, शिकवले नाना बहाणे।

सोंग पण फसव्या जिण्याचे, शेवटी शिकलोच नाही...

कैकदा कैफात माझ्या, मी विजांचे घोट प्यायलो।

पण प्रकाशात तरीही हाय, मी पेटलोच नाही...

सारखे माझ्या स्मितांचे, हुंदके संभाळले मी।

एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही...

स्मरतही नाही मजला, चहरे माझ्या व्यथांचे।

एवढे स्मरते मला की, मी मला स्मरलोच नाही...

वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिर्हाईत।

सुचत गेली रोज़ गीते; मी मला सुचलोच नाही...

संपल्यावर खेळ माझ्या, आंध्ल्या कोशिम्बिरिचा।

लोक मज दिसले अचानक,मी कुठे दिसलोच नाही...