Wednesday, May 20, 2009

प्रेम

प्रेम ही एक स्वाभाविक भावना आहे, तरीही प्रेमात पडण्याची वा प्रेमात असण्याची परिस्थिती निर्माण करण्याची योजना तुम्ही ठरवून अमलात नाही आणू शकत. ही बाबच अशी आहे की, तुमचं तिच्यावर अजिबात नियंत्रण नसतं. तुम्ही एकतर प्रेमात पडता किंवा पडत नाही. ही घटना तुमच्याकडून घडून जाते. रामकृष्णांनी वेगळ्या प्रकारे समजावताना म्हटल्याप्रमाणे ज्यावेळी प्रचंड लाट येते, त्यावेळी छोटे-मोठे ओढे नि नाले काही समजायच्या आत विनासायास काठोकाठ भरून जातात.

अर्थात एखादी व्यक्त प्रेमात आहे की नाही हे ओळखण्यासाठी काही निकष आहेत. याची पहिली चाचणी म्हणजे तुम्ही प्रेम करत असलेली गोष्ट केवळ तुमच्याच ताब्यात असावी असा तुमचा आग्रह नसतो. सगळ्या जगाला तुमच्या प्रेमाची महती कळावी अशीच तुमची इच्छा असते. अगदी घराच्या छपरावरून ओरडून जगाला तुमच्या प्रेमाची ओळख करून देण्याची तुमची तयारी असते. तुम्ही प्रेमात असलेल्या व्यक्तीच्या सुखासाठी काहीही करायची तुमची तयारी असते. महात्मा गांधींनी म्हटलंय प्रेम आणि संपूर्ण मालकीची भावना कधीच एकत्र नांदू शकत नाहीत. तात्त्विकदृष्ट्या जिथे कुठे आदर्श प्रेम आहे, तिथे ताबा ठेवण्याच्या वृत्तीचा लवलेशही असता कामा नये.

प्रेमाची दुसरी चाचणी म्हणजे इथे घासाघिशीची शक्यता नसते. कशाच्या तरी बदल्यात बक्षीस वा कमतरतेच्या बदल्यात दंड वगैरे गोष्टी प्रेम ओळखत नाही. प्रेम स्वत:च एक गुणवत्ता असते, ते स्वत:च एक बहुमान असते. स्वत:च्या अस्तित्त्वाखेरीज प्रेमाला कारण, फायदे या बाबी नसतात, प्रेमाचा आविष्कार हीच प्रेमाची फलनिष्पत्ती असते.

एखादी इच्छा वा लाभाची अपेक्षा बाळगून, काहीतरी कमावण्यासाठी तुम्ही कुणाच्या प्रेमात पडत नाही, तर प्रेमाच्या अनुभूतीसाठी तुम्ही प्रेमात पडता. कुठलातरी शाश्वत वा अशाश्वत शेवट गाठणं म्हणजे प्रेम नाही, तर प्रेम स्वत:च एक शेवट आहे, आपल्याबाबतीत काही चांगल्या घटना घडल्या की, त्यांना दिलेला प्रतिसाद म्हणजे प्रेम नाही, तर प्रेम ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. ओशो म्हणतात, तुम्ही प्रेम दिलंत की, ते लाखपटीने तुम्हाला परत मिळतं. इथं देणं ही क्रिया इतकी स्वाभाविक व परिणामदर्शक आहे की, जर तुम्ही दिलं नाहीत, तर ते तुम्ही गमावता, तुमच्या डोक्यावर ते एक ओझं बनून राहतं. प्रेमाचं रुपांतर द्वेषात होतं, ते मग भीती, दु:स्वास, ताबा ठेवण्याची वृत्ती अशा मार्गानं प्रकटू लागतं.

प्रेमाची तिसरी चाचणी म्हणजे 'मी'पणाला, 'अहं'ला रामराम! प्रेम करणं म्हणजे दुसऱ्याला विनाअट शरण जाणं, स्वत:मधला आणि दुसऱ्यामधला भेद संपुष्टात आणणं, आपल्या 'अहं'ला तिलांजली देणं. खऱ्या प्रेमामध्ये प्रियकर आणि प्रेयसी एक होऊन जातात. स्वत:ची वेगळी अशी ओळख, अलगत्वाची भावना नाहीशी होते. त्यामुळे मग दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर बंधनं टाकण्याचा प्रश्नच येत नाही, उलट अशा एकीकरणामुळे प्रेमीजनांना प्रचंड स्वातंत्र्य मिळतं, अहंकाराच्या बंधनापासून ते मुक्त होतात.

खऱ्या प्रेमाची चौथी चाचणी म्हणजे ते भयमुक्त असतं. अतृप्त इच्छांमुळे भीतीची भावना निर्माण होण्याची शक्यता असते. तुमच्या प्रेमामध्ये कुठल्यातरी दंडाची, शिक्षेची शक्यता असेल, किंवा अतृप्त इच्छांच्या पुर्ततेची आशा असेल, तर याला प्रेम म्हणता येणार नाही. प्रेम आणि भीती एकत्र नांदू शकत नाहीत, कारण जिथे प्रेम असते, तिथे इच्छा वा मागण्यांना थारा नसतो.

प्रेमाची पाचवी चाचणी म्हणजे तुम्हाला जे सवोर्त्कृष्ट वाटतं, त्याच्यावर तुम्ही प्रेम करता. त्यामुळे प्रियकर वा प्रेयसी, एखादी गोष्ट वा आदर्श हे एकमेव असतात, त्यांच्याप्रमाणे दुसरं कोणी नसतं. प्रियकराच्या नजरेत ते सवोर्च्च स्थान असतं, इतरांना काय वाटतं याचा त्याच्याशी काही संबंध नसतो. दुसऱ्यांसाठी दुसरा एखादा आदर्श सवोर्च्च स्थानावर असेल, परंतु प्रियकरासाठी त्याची आवडती व्यक्ती वा आदर्शच सवोर्त्तम असतो.

प्रेमाची सहावी चाचणी म्हणजे प्रियकर आपल्या प्रेमाच्या बाबतीतल्या विद्वत्ताप्रचुर पण आधार नसलेल्या चर्चा-मसलतींना फारसं महत्त्व देत नाही. अशा तात्त्विक उहापोहाकडे दुर्लक्ष करून तो आपल्या थेट अनुभवाला प्राधान्य देतो. तो उगाच कारणं देत बसत नाही, वा आपली बाजू वादविवादाच्या माध्यमातून इतरांना पटवायलाही बघत नाही. तो केवळ स्वत:चा थेट अनुभव आणि जाणीव यांच्यावर विसंबतो.

Posted by Pranav…..

No comments: